आंबेडकरवादी बौद्ध भिक्खु कसा असावा ?

 या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आदरणीय  डाक्टर यशवंत मनोहर यांनी प्रयत्न केला आहे. सर्व सन्माननीय भिक्खुंनीही त्यांच्या उत्तराचा गंभीरपणे विचार करावा, अशी त्यांची विनंती आहे. यामागे समाज परिवर्तनाची एक उत्कट कळकळ आहे. 

           डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला. परंतु त्या समाजातील माणसे देव देवतांच्या पूजेमागे धावू लागली आहे. नवस - सायास, तीर्थयात्रा करू लागली आहे. जाती पोटजातींमध्ये परतू लागली आहे. समूहभान मावळत चाललेले आहे. सामाजिक मन नष्ट होत आहे. व्यक्तीकेंद्रपणा वाढत आहे. बुद्धीवादी तत्त्वज्ञान व क्रांतिकारी जीवनदृष्टी याची परीवर्तनाची चळवळ पुढे न जाता झपाट्याने मागे जात आहे. 

           यावेळी बौद्ध भिक्खुंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडते. आजच्या निर्जीवतेत क्रांतिकारी प्राण भिक्खु भरू शकतात. बाबासाहेबांना अभिप्रेत क्रांतिचे नायक ठरू शकतात. चीवर काषाय रंगाचे - अग्नीरंगाचे आहे. बौद्ध भिक्खु परीवर्तनाच्या चळवळीला अग्नीपंख देऊ शकतात. 

            भिक्खुसंघाच्या निर्मितीमागे समाज परिवर्तन हाच हेतू आहे. समाजात समता, बांधुता आणि बुद्धीवाद निर्माण करणे हा उद्देश भिक्खुसंघ निर्माण करण्यामागे होता. भिक्खु म्हणजे समाज परिवर्तनाच्या चळवळीतील निष्ठावंत आणि पूर्णवेळ सैनिक असे बुद्धाला अभिप्रेत होते.

            सिद्धार्थाने प्रथम 5 परीव्राजकांना आपला धम्म सांगितला. निष्ठावंत, अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न भिक्खुंची गरज समाजाला आहे. चळवळ कार्यकर्त्यांच्या पावलांनीच लोकांच्या मनापर्यंत चालत जाते. विनय नावाच्या आदर्श नियमांनी भिक्खुसंघाला बद्ध केले गेले.

           धर्माला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी झटणे हे भिक्खुचे जीवनध्येय आहे. समाजरचनेत देव, आत्मा, स्वर्ग, नरक अशी कोणतीही अंधश्रद्धा नसेल. भिक्खु हे बुद्धीप्रामाण्यवादी सक्रिय लोकांचे संघटन असेल. भिक्खु म्हणजे क्रांती आणि परीवर्तनाचा सक्रिय मार्गदर्शक आहे. भिक्खु हा अभ्यासू, विचारवंत म्हणजे ज्ञानवंत असला पाहिजे. समाजावर होणार्या अन्यायाकडे पाठ फिरवणारी व्यक्ती भिक्खु होऊच शकत नाही. माणसाला त्याच्या जातींच्या, धर्मांच्या, उच्चनिचतेच्या, स्वार्थाच्या, ढोंगाच्या, दांभिकपणाच्या, खोटेपणाच्या, अंधश्रद्धांच्या चिखलातून आणि अशाच सर्व प्रकारच्या विघटनशील संस्कारामधून मुक्त करायची जबाबदारी भिक्खुंची आहे.

         --भिक्खु आणि भिक्खुणी यांनी--

1. समाजाला सतत धम्म सांगायचा आहे.
2. समाजापुढे बुद्धधम्मीय माणसाच्या जगण्याचा आदर्श ठेवायचा आहे.
3. त्याने अविवाहित राहायला हवे. व्यभिचारापासून दूर रहावे.
4. त्याने चोरी करता कामा नये.
5. त्याने वृथा वल्गना करू नये. खोटे बोलू नये.
6. त्याने जीवहत्या करू नये.
7. त्याने केवळ पुढील वस्तू बाळगाव्यात -
○ 3 चीवरे
○ करगोटा
○ भिक्षापात्र
○ वस्तरा
○ सुई- दोरा
○ पाणी गाळण्याचा कपडा
8. ऐषआरामापासून दूर राहावे.
9. निर्धन असले पाहिजे. स्वतःची मालमत्ता बाळगू नये.
10. सतत जागृत असले पाहिजे. मादक पदार्थाचे सेवन करू नये.
11. धम्मसमाज करण्यासाठी सतत फिरत राहायला हवे.
12. घर किंवा कुटुंब करता कामा नये किंवा पूर्व आयुष्यातील कुटुंबीयांबद्दल आसक्ती असता कामा नये.
13. निरपेक्षपणे जनसेवा करावी.
14. लोककल्याणासाठी त्याला"चरथ भिक्खवे " म्हटले आहे.
15. अवेळी अन्नसेवन करू नये.
16. अलंकाराने शरीर भूषवू नये.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

           डा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात  सांगितले आहे की, बौद्ध भिक्खु संघाच्या संघटनेत, ध्येयधोरणात  व कार्यप्रणालीत   अमुलाग्र  बदल घडवून आणायची गरज आहे. कारण -

1. भिक्खु संघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीच, परंतु जनसेवाही करीत नाही. तशी वृत्ती भिक्खुत राहली नाही.

2. सद्स्थितीतील भिक्खु संघ बौद्ध धम्म  प्रसारासाठी निरूपयोगी  आहे.

3. भिक्खुंमधे साधू व संन्यासवृत्तीने  राहणार्यांची  संख्या  जास्ती  आहे. हे सगळे भिक्खु आपला वेळ नुसत्या ध्यान, आळस किंवा इतर अनुत्पादक  कामांमधे घालवतात. भिक्खु संघ नुसत्या  आळशी, ऐतखाऊ व ऐदी लोकांचा समुदाय झाला आहे

4. भिक्खु संघाने ख्रिस्त पाद्र्यांपासून  प्रेरणा  घ्यावी. लोकांची शैक्षणीक व वैद्यकीय सेवा करावी. त्याबरोबर कला व विज्ञान  यांची सांगड घालून धम्म प्रसार करावा. नालंदा व तक्षशिला  विद्यापीठे भिक्खुंनी स्वतः चालविली होती.

5. भिक्खु सुशिक्षित, बुद्धीमान व सतत कार्यप्रवण असावा.

6. आपल्याकडे बोट दाखवायला कोणतीही जागा- कारण असू नये याची काळजी भिक्खुंनी   घेतलीच पाहिजे. यासाठी भिक्खुंनी स्वतःच स्वतःचे कठोर परीक्षण करायला हवे.

7. उगीचच वैयक्तीक - कौटुंबिक कारणांसाठी भिक्खु होऊ नये. आणि एकदा भिक्खु म्हणून  आपण वसा पत्कारला तर प्राणप्रणाने तो वसा पाळायला हवा.

8. धम्म जिवंत ठेवण्याचे, त्यांचा प्रचार - प्रसार करण्याचे, त्याची प्रतिष्ठा वाढविण्याचे महान कार्य   भिक्खुंना करायचे आहे.

9. भिक्खुने लोकांना बुद्धाचे बुद्धीवादी आणि  लोक कल्याणकारी तत्वज्ञान सतत सांगितले पाहिजे .

10. समाजात वेळोवेळी निर्माण होणार्या  आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांतील विषयांचे अत्यंत अभ्यासपूर्ण  शिक्षण  दिले पाहिजे व दिशा दिग्दर्शन केले पाहिजे. 

11. बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार माणसे जगावीत असे सांस्कृतिक वातावरण भिक्खुंनी समाजात कष्टपूर्वक तयार केले पाहिजे. 

12. भिक्खुंनी त्यांना कोणी ऐतखाऊ म्हणता  कामा नये याची काळजी भिक्खुंनी घ्यायलाच हवी.

13. भिक्खुंनी समाजाला धम्माची वैचारीक भूमिका सतत सांगत राहावे. जेणेकरून  भिक्खुंचा सर्वांनाच मनापासून आदर वाटायला पाहिजे. त्यातूनच समाजाने भिक्खुंच्या पोटापाण्याची सोय करायलाच हवी.

14. आपण पिवळे संकट नसून दुनियेसाठ निळे वरदान आहोत, दुनियेच्या सुखी आणि सुसंस्कृत जीवनाची हमी आहोत याचे सबळ पुरावे भिक्खुंनी तयार करायला हवेत.

15. सातव्या- आठव्या वर्गात शिकणार्या   विद्यार्थ्यांना धम्मशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. 

16. जगातील क्रांत्यांचे इतिहास मुलांना शिकविले जावेत. क्रांतिकारक , वैज्ञानिकांनी  व  तत्वज्ञानींनी जगाला बदलण्यासाठी काय काय केले व त्या बदल्यात त्यांचा त्यासाठी कसा छळ झाला तेही सांगितले जावे.

17. भारतीय समाज रचना, तिची वैशिष्ट्ये आणि  उणिवा, जगातील वेगवेगळ्या समाज रचना आणि त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली जावीत.

18. यासाठी विद्वान भिक्खु आधी तयार करावे लागतील.

19. भिक्खुत उदंड संघटन कौशल्य असावे.

20. विहार ही परीवर्तनाची पाठशाळाच व्हायला  हवी. आळसात वेळ घालविण्यासाठी, ध्यान - समाधी लावण्यासाठीच विहार असता कामा नये.

21. त्रिसरण - पंचशील ही काही प्रार्थना नव्हे. ती प्रतिज्ञा आहे. स्वतःप्रती  चांगले असण्यासंबंधी  करण्याचा तो निर्धार आहे.

22. लोकांनी हातात ग्रहांच्या अंगठ्या घालू नका. हातात गंडेदोरे बांधू नका असे भिक्खुंनी   समाजाला सांगायला हवे.

23. भिक्खुंनीसुद्धा लोकांना गंडेदोरे बांधू नयेत.

24. कोणत्याही देवी - देवतांची, बाबा - बुवांची पुजा करू नका, तिर्थयात्रेला जाऊ नका, हिंदू   सण साजरे करू नका असे लोकांना भिक्खुंनी  सांगावे.

25. कोणी देव नाही ,भूत नाही, दैवी शक्ती   नाही. त्यामुळे कोणाची भक्ती करू नका, कोणाला नवस करू नका हे भिक्खुंनी   समाजाला सांगावे.

26. भिक्खुंनी चिंतन, ध्यान नवनव्या  प्रश्नांचे - विषयांचे करावे. त्याबाबत समाजात जाणिव जागृती करावी.

27. भिक्खुंनी डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलाच बुद्ध धम्म लोकांना सांगावा. महायानातील वाङमय, त्यांच्या अंधश्रद्धा, देव - दैव, जातककथा इत्यादी लोकांना सांगू नये.

28. प्रतीत्यसमुत्पाद, अनित्यता, अनात्म या मुलभुत तत्वावर आधारित बुद्धीवादी तत्त्वज्ञान समाजाला सांगावे.

29. आर्थिक, सामाजिक संकटे व त्यातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांची  माहिती समाजाला वेळोवेळी द्यावी.

30. संविधान, लोकशाही, समाजवाद,विज्ञाननिष्ठ विचार यांचा सखोल अभ्यास करून समाजाला  समजावून सांगावे.

31. परिवर्तनवाद्यांचे, आंबेडकरी चळवळीतील वेगवेगळ्या घटकांचे एकीकरण होईल यासाठी  भिक्खुंनी प्रयत्न करावे.

32. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची जिद्द आणि कर्तुत्वाच्या प्रेरणा जागवाव्यात.

33. लोकांमध्ये चिकित्सकदृष्टी वाढेल, विज्ञानदृष्टीकोन वाढेल, अभ्यासूवृत्ती वाढेल, जबाबदारपणा वाढेल यासाठी सतत संवाद, मार्गदर्शन भिक्खुंना करावे लागेल.

34. प्रत्येक घरी योग्य पुस्तकांचा संग्रह असेल व पुस्तकांचे वाचन होईल यासाठी लोकांना प्रेरणा द्यावी लागेल.

35. अनेक शासकीय विषयनिहाय माहिती - पुस्तिका जिल्हा कार्यालय व इतर कार्यालयामधून प्राप्त करून त्याची माहिती, त्याची चर्चा व त्यावर पाठपुरावा करून लोकांना योजनांचा फायदा मिळवून देण्याचे संघटन विहार पातळीवर तयार करण्यात यावे.

36. पुढील काळ महाकठीण आहे. छोटे, मध्यम, मोठे, उद्योग व्यवसाय करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती संकलित व अद्ययावत प्राप्त करून त्यातून नव उद्योजक घडविण्याची प्रक्रिया बौद्ध विहारातून निरंतर सुरु व्हायला हवी.

37. भिक्खुंनी परीत्राण करण्याऐवजी लोकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक समस्यांची ओळख करून द्यावी व त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी प्रबोधन करावे.

38. पुरोहित - पंडे - पुजारी - संत - महंत - आचार्य यांचेपेक्षा भिक्खु वेगळे आहेत अशी प्रत्यक्ष सातत्यपूर्ण कृती भिक्खुंकडून व्हावी.
------------------------------ ------------------------------
------------------------------ ------------------------------
           समाजानेसुद्धा भिक्खु अशाप्रकारे आचरण करीत असेल , अशाप्रकारे समाज प्रबोधन करीत असेल, तरच त्यांना सर्व  प्रकारची मदत सहकार्य करायला हवे.
            आज समाजात नकली भिक्खुंचा सुळसुळाट झाला आहे. धम्माला विकृत स्वरूप देण्याचा पद्धतशीर प्रयत्न सातत्याने होत आहे. अशावेळी भिक्खुंनी व आपण सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे. आपण आपल्यातील दोष शोधून दूर करायला हवे.आज विहारात स्थानापन्न झालेल्या नकली बौद्ध भिक्खु यांना शोधून काढले पाहिजे. विचारात राहणार्या बौद्ध भिक्खु ज्यांचा वरील मुद्यांवर  पुरेसा अभ्यास नाही त्यांना अभ्यास करण्यासाठी साहीत्य, पुस्तके, सोय उपलब्ध करून वेळेची निश्चित मर्यादा ठरवून द्यायला हवी.
           आजचा महाकठीण काळ व परीस्थिती ने आपल्या सर्वांवर सोपविलेली ती नैतिक सामाजिक आर्थिक धार्मिक वैचारिक जबाबदारी आहे.
            आपण सर्वांनी वर नमूद 16 व 38 मुद्द्यांवर चर्चा करून आपल्या जवळच्या बौद्ध विचारात मोठ्या अक्षरात ठळक दिसेल अशा ठिकाणी प्रबोधनासाठी व प्रत्यक्ष कृतीसाठी लावण्याचा विचार करावा.
              याबाबत पत्रक काढून लोकांना जागृत करावे. सोबतच बौद्ध भिक्खु यांनाही याबाबत सचेत करावे. ही आपली सर्वांची सामाजिक धार्मिक जबाबदारी आहे.
आंबेडकरवादी बौद्ध भिक्खु कसा असावा ? आंबेडकरवादी बौद्ध भिक्खु कसा असावा ? Reviewed by Unknown on 18:42 Rating: 5

No comments:

Social Networks

Powered by Blogger.